मुंबई : मुंबईमधील वांद्र्याच्या एमआयजी क्रिकेट क्लबमधील पॅव्हेलियनला 'सचिन रमेश तेंडुलकर' असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे याच मैदानावर सचिन आयुष्यात पहिल्यांदा क्रिकेट खेळला होता. हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण असल्याचं सचिनने म्हटलं आहे. सचिनने  एमआयजी क्रिकेट क्लबच्या मैदानावर कॅम्पसाठी आलेल्या लहानग्यांना सचिननं क्रिकेटचे धडे दिले.



या नामकरण कार्यक्रमाला स्वत: सचिन तेंडुलकर उपस्थित होता. सचिनचे मोठे बंधू अजित तेंडुलकर आणि माजी क्रिकेटर विनोद कांबळी उपस्थित होते. विशेष म्हणजे एमआयजी क्लबच्या याच मैदानावर सचिनने लहानपणी क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. यावेळी सचिनने त्याच्या लहानपणीच्या क्रिकेटच्या आठवणी जागवल्या.



मी आयुष्यातील पहिलं क्रिकेट एमआयजी क्रिकेट क्लबच्या मैदानात खेळलो. त्यावेळी टेनिस बॉलवर मी क्रिकेट खेळलो. मात्र आज त्याच क्लबच्या मैदानातील पॅव्हेलियनला माझं नाव दिलं गेलं आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्यासाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे. एमआयजी क्लबच्या सर्व कमिटी मेंबर्सचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने दिली आहे.


सचिन तेंडुलकरच्या जडणघडणीत एमआयजी क्रिकेट क्लबचा मोलाचा वाटा आहे. सचिननं आपल्या भाषणात त्या नात्याचा आवर्जून उल्लेख केला. सचिन लहानाचा मोठा झाला ती वांद्रे पूर्वची साहित्य सहवास सोसायटी, एमआयजी क्रिकेट क्लबपासून अगदी काही मिनिटांच्या अंरावर आहे. त्यामुळे शिवाजी पार्कनंतर सचिनच्या जडणघडणीत एमआयजीचं महत्त्वाचं स्थान आहे. त्या दोघांमधल्या याच नात्याला आज वेगळं अधिष्ठान मिळालं.