डोंबिवली: कल्याण तालुक्यातील नागरिकांना आता पासपोर्ट काढण्यासाठी ठाणे किंवा मुंबईची वाट धरावी लागणार नाही. कारण की, लवकरच डोंबिवलीत पासपोर्ट काढता येणार आहे. यामुळे अनेक नागरिकांना फायदा होणार आहे.
डोंबिवलीच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना पत्राद्वारे दिली आहे.
केंद्र सरकारने 50 किलोमीटर अंतरापर्यंत पासपोर्ट केंद्र सुरु करण्याची योजना सुरु केली आहे. त्याच अंतर्गत आता डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होईल. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वीच 149 पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांची घोषणा केली होती.
यातील परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं पहिल्या टप्प्यात 86 पीओपीएसके सुरु करण्यात येणार आहेत. हे परराष्ट्र खातं आणि पोस्ट ऑफिसच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात येणार आहेत. सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र खात्याची सूत्रं हाती घेतल्यापासून 16 नवीन पासपोर्ट कार्यालये सुरु केली आहेत. यात ईशान्य भारतातील राज्यांना प्राथमिकता देण्यात आली होती.
याआधी देशात एकूण 77 पासपोर्ट कार्यालय आहेत. त्यातच आता नव्या 149 पासपोर्ट कार्यालयं सुरु करण्यात येणार आहे.