मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या एका तरुणाने दंडाची रक्कम वाचवण्यासाठी स्टेशनच्या 30 फूट उंचावरुन उडी मारली. सुदैवाने तिचा जीव बचावला असून फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. घाटकोपर मेट्रो स्टेशनवर रविवारी रात्री 8.45 वाजता ही घटना घडली.
मूळ ओरिसाचा असलेला राजकुमार मुंबईत टाईल्स बसवण्याचं काम करतो. आपण साकीनाका मेट्रो स्टेशनहून घाटकोपरला गेलो. घाटकोपर मेट्रो स्टेशनला बाहेर पडताना टोकन टाकूनही गेट उघडला नाही, असा दावा राजकुमारने केला आहे.
गेट न उघडल्यामुळे राजकुमार ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट ओलांडून पलिकडे गेला. त्यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला हटकल्यामुळे तो पुन्हा गेट ओलांडून माघारी आला. त्यावेळी मेट्रो अधिकाऱ्यांनी त्याला दंडाची रक्कम भरण्यास सांगितलं.
मेट्रोचे अधिकारी राजकुमारला ग्राहक समस्या निवारण कक्षाकडे नेत असताना त्याने हिसका देऊन पळ काढण्यात यश मिळवलं. त्यानंतर त्याने थेट रस्त्यावर उडी मारली. मेट्रो स्टेशनच्या तिसऱ्या मजल्यावरुन म्हणजे साधारण 30 फूट अंतरावरुन ही उडी घेतली. घाटकोपर पोलिसांच्या मदतीने त्याला रात्री 9.15 च्या सुमारास राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
राजकुमारच्या गुडघ्याला फ्रॅक्चर झालं असून हनुवटीला टाके घातले आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.
राजकुमारने योग्य तिकीट काढलं होतं. मात्र थेट घाटकोपरला येण्याऐवजी तो मेट्रो स्टेशन्सवर फिरत राहिला. एक तासाच्या आत नियोजित प्रवास पूर्ण करण्याची लिमीट उलटल्यामुळे त्याचं टोकन अवैध दाखवण्यात आलं.