मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासासाठी आता 1 फेब्रुवारीपासून सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. या प्रवासासाठी निर्धारित वेळाही आखून देण्यात आल्या आहेत. किंबहुना वेळेआधीही प्रवाशांना रेल्वेचं तिकीट उपलब्ध होणार आहे. पण, असं असलं तरीही त्यांननी प्रवास मात्र वेळेतच करणं अपेक्षित असेल.


मुंबई लोकलमध्ये ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त प्रवास केल्यास तुम्हाला याची शिक्षा होऊ शकते. निर्धारित वेळेतच प्रवास न केल्यास 200 रुपये दंड आणि 1 महिन्याचा तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळं रेल्वेनं प्रवास करतेवेळई वेळेचं भान ठेवणं यापुढे अतिशय महत्त्वाचं असणार आहे.


पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 वाजल्यापासून अखेरच्या लोकलपर्यंत सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा असेल. पण, यादरम्यानच्या वेळांमध्ये परवानगी नसतानाही प्रवास करणाऱ्यांना शिक्षा होणार हे आता स्पष्ट हेत आहे.
लोकल प्रवाशांना दिलासा


एकिकडे बेजबाबदारपणे नियमांचं उल्लंघन करत प्रवास करणाऱ्यांना रेल्वे प्रशासन वेसण घालण्याच्या तयारीत असतानाच दिसरीकडे रेल्वे पासधारक प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे. लॉकडाऊनपूर्वी रेल्वेचे पास काढले आणि लॉकडाऊनमुळं पास निकामी ठरणार असं वाटत असतानाच आता लॉकडाऊननंतर रेल्वे पासचे जेवढे दिवस शिल्लक राहिले आहेत, तेवढी मुदतवाढ प्रवाशांना देण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीनं यासंदर्भातील माहिती देण्यात आली.



दहा महिन्यांनतर लोकल रुळावर...


तब्बल दहा महिन्यांनंतर मुंबईकरांना लोकलची दारं सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुली होणार आहेत. या धर्तीवर स्थआनकांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन रेल्वेनं पूर्वतयारी सुरु केली आहे. "कमी प्रवासी असल्यामुळे आम्ही काही तिकीट खिडक्या, पादचारी पूल आणि लिफ्ट बंद ठेवल्या होत्या. आता मात्र त्या पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरु करत आहोत", असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.