मुंबई : मुंबईतील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र, नगरसेवक नील सोमय्या यांना काल मुलुंड पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. एका जुन्या खंडणीप्रकरणी नील सोमय्या यांनी पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. तसेच मुलुंड पोलिसांकडून नील सोमय्या यांचा या गुन्हासंदर्भात जबाब नोंदवण्यात आला असल्याची माहिती, पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जवळपास तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नील सोमय्या यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे की, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एक मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने आपल्या दोन टॉवर्सचं काम एका खासजी ठेकेदाराला दिलं होतं. परंतु, नील सोमय्या यांनी ठेकेदाराला धमकावून ते काम आपल्या ओळखीतल्या एका ठेकेदाराला मिळवून दिलं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन लोकांना अटकही केली आहे.


काय आहे प्रकरण?


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घोटाळ्याचे नवनवीन आरोप करणारे किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 2020 साली जानेवारी महिन्यात एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने आपल्या दोन टॉवर्सशी निगडीत काम एका खाजगी ठेकेदाराला दिलं होतं. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या मुलाने नील सोमय्या यांच्याशी संबंधित काही लोकांनी ठेकेदाराला नील सोमय्या यांच्या ऑफिसमध्ये बोलावून एका टॉवरचं काम त्याच्याकडून काढून घेतलं. परंतु, काही दिवसांनी लोकांनी नील सोमय्या यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा ठेकेदाराला बोलावलं आणि त्याला धमकी दिली. तसेच त्याच्याकडून दुसऱ्या टॉवरचं कामही दे किंवा त्याबदल्यात आम्हाला फ्रॉफिट दे असं सांगितलं.


याप्रकरणी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. अशातच एका वर्षानंतर मुलुंड पोलिसांनी पुन्हा एकदा याप्रकरणी नील सोमय्या यांना समन्स बजावत चौकशीसाठी बोलावलं होतं. नील सोमय्या यांची तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला.