मुंबई : युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, असा आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे. अमित शाह यांनी आज मुंबईत येऊन महाराष्ट्र आणि गोव्यातील विस्तारक आणि पदाधिकाऱ्यांशी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी भाषण न करता पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधण्यावर भर दिला.


अमित शाह यांनी स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींच्या कामाचा आढावा घेतला. यामुळे कार्यकर्त्यांचे एकाधिकारशाहीचे आरोप पुसत पक्षात लोकशाही पद्धतीने काम होत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

विस्तारकांवर बूथ रचनेची प्रमुख जबाबदारी असून 'एक बूथ 25 युथ' नुसार नेमणुका करण्यास अमित शाह यांनी सांगितले. तसेच, प्रत्येक बूथ प्रमुखाला 23 सूत्री कानमंत्र देण्यात आला असून, त्यानुसार वेळबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.

भाजपच्या 23 सूत्री कार्यक्रमात कोणत्या गोष्टी असतील?

- प्रत्येक बूथ सदस्य किमान पाच कुटुंबांच्या संपर्कात असेल

- प्रत्येक बूथ सदस्याकडे मोटरबाईक असावी

- प्रत्येक बूथचे व्हॉट्सअप ग्रुप असावेत

- बूथ सदस्यांनी सर्व धार्मिक आणि राष्ट्रीय सण बूथ पातळीवर साजरे करावेत, लोकांना सहभागी करुन घ्यावे

- मतदार यादीत संपर्कात असलेल्या सर्व कुटुंबीयांची नोंद करुन घ्यावी

- त्यांना मतदानासाठी बाहेर काढावं

- किमान 51 टक्के मतदान होईल यासाठी कष्ट घ्यावे

- शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात आणि त्यांना लाभ मिळेपर्यंत पाठपुरावा करावा

-  भाजपचे पारंपरिक मतदार, काठावरचे मतदार आणि भाजप विरोधी मतदार अशा तीन गटात मतदारांची वर्गवारी करावी

- जात, धर्म, भाषानिहाय मतदारांच्या वर्गवरी करुन त्यांच्या सूक्ष्म समस्या जाणून घ्याव्यात

- सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपली कामं होतीलच अशी अपेक्षा ठेऊ नये

- दिलेलं काम निश्चित वेळेत प्रामाणिकपणे केलं, तर इतर पक्षांवर युतीसाठी अवलंबून राहावं लागणार नाही