मुंबई : मनसेने मुंबईतल्या खड्ड्यांविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त अजॉय मेहता यांना प्रतिकात्मक श्रद्धांजली देत आज मनसेने मुंबईतल्या खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं.

साकीनाका मेट्रो स्टेशन जवळच्या परिसरात खड्ड्यांनी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. याच ठिकाणी मनसेने आंदोलन करत महापौर आणि आयुक्त यांच्या फोटोला हार वाहिले, तसंच त्यांनी न केलेल्या कामाला श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजलीही वाहिली.

येत्या आठ दिवसांत मेट्रो पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यांवरचे खड्डे भरले गेले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा आणि जबाबदार लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यात उभं करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

दरम्यान, यापूर्वी मनसेने सायन-पनवेल महामार्गावर असलेल्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं होतं. या आंदोलनाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुकही केलं होतं. शिवाय राज्यभरातल्या खड्ड्यांविरोधात मनसे शांत बसणं शक्य नाही, असा इशाराही त्यांनी दिला.