ठाणे : पोपटांकडून चिठ्ठी काढून भविष्य सांगणारे भोंदू बाबा आपल्याला रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र या बाबांकडून पोपटांचा मोठा छळ केला जातो. अशा भोंदू बाबांवर कारवाई करत टिटवाळ्यात पोपटांची सुटका करण्यात आली.
पोपटांचे पंख कापणे, त्यांना उपाशी ठेवणे, पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवणे असे प्रकार या भोंदू बाबांकडून केले जातात. त्यामुळे वनविभागाने या भोंदू बाबांवर धडक कारवाई करत पोपटांची सुटका केली.
टिटवाळ्यात अंगारकी चतुर्थीनिमित्त अनेक भोंदू बाबा पोपट घेऊन बसले होते. याबाबत माहिती मिळताच कल्याण वन परिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी धाव घेत हे सगळे पोपट जप्त केले.
या पोपटांना बंदिस्त करून ठेवणाऱ्या या बाबा लोकांविरोधात वन्यजीव अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोपटांवर उपचार करून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केलं जाणार आहे.