कल्याण : शाळेने सांगितलेली पुस्तकं विकत न घेतल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण करत शिक्षा केल्याचा प्रकार कल्याणच्या सेंट मेरी शाळेत घडला आहे. याविरोधात आक्रमक झालेल्या पालकांनी शाळेविरोधात थेट पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पूर्वेच्या चक्कीनाका परिसरात ही सेंट मेरी शाळा आहे. या शाळेने यंदा अवास्तव फी वाढ केली, तसंच स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं सोडून आम्ही सांगू तीच पुस्तकं विकत घ्या, असं फर्मान सोडलं. याविरोधात पालक आक्रमक झाल्यानंतर शाळेने केडीएमसीच्या शिक्षण समितीच्या मध्यस्थीने नरमाईची भूमिका घेतली. मात्र काही दिवसातच ज्या विद्यार्थ्यांनी नवीन पुस्तकं आणली नाहीत, त्यांना शिक्षा करण्यास शाळेने सुरुवात केली.
अशाचप्रकारे दोन विद्यार्थ्यांना मारहाण आणि शिक्षा केल्यानंतर संतप्त पालकांनी थेट कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत शाळेविराधात मारहाण आणि बालअपराध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र शाळेची मुजोरी कमी झालेली नसल्याने आज सकाळी शाळेबाहेर पालकांनी आंदोलन केलं. शाळेने आपली भूमिका बदलली नाही, तर शाळेबाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
तर शाळा प्रशासनाने मात्र आज शाळेला कुलूप लावत शाळा बंद केली. शाळेच्या सुरक्षारक्षकांना विचारलं असता शाळेत सध्या कुणीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याचं त्यांनी सांगितलं.