मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची योग्य रित्या चौकशी होत नसल्याने तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केली होती. अखेर, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाकडून याबाबतची माहिती अनुप डांगे यांना देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्यावर्षी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी व्हॉट्सअॅप ग्रुपवर वरिष्ठांच्या विरोधात संदेश पाठवल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
पोलीस निरीक्षक अनुप संभाजी डांगे यांची त्यावेळी गावदेवी पोलिस ठाण्यातून दक्षिण प्रादेशिक परिमंडळ विभागात त्यांची बदली करण्यात आली होती. 23 नोव्हेंबर 2019 ला गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशीरापर्यंत सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलीस तेथे गेले होते. त्यावेळी पोलीस नाईक संतोष पवार यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी जीतू नवलानी याला आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर परमबीस सिंह मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्या प्रकरणाचा ठपका ठेवत डांगे यांची दक्षिण प्रादेशिक परिमंडळाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यावेळी डांगे यांनी त्यावेळी अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. त्यात डर्टी बन्स पबचे मालक जितू नवलानी याने परमबीर सिंह यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगून दबाव टाकण्याचे प्रयत्न केला होता, असा आरोप पत्रात केला होता.
या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक असलेल्या परमबीर सिंग यांनी यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी तेथे जाण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर फेब्रुवारी, 2020 मध्ये परमबीर सिंग मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जीतू नवलानी याच्या सांगण्यावरून डांगे यांना नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप या पत्रात केला होता. तसेच सिंह यांच्या अंडरवर्ल्डसोबत संबंधांबाबतची चौकशी करण्याची मागणी केली होती. 2 फेब्रुवारी, 2021 मध्ये करण्यात आलेल्या या तक्रारीला वर्ष होत आले असतानाही त्याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. त्याबाबत नाराजी व्यक्त करत डांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे.