मुंबई : कोविड-19 लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर आज 45 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही. तर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पालिकेने ठरवून दिलेल्या 5 केंद्रांवर सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.


तसेच ज्यांची कोविन अँपमध्ये नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेला आहे, त्यांनाच लसीकरण केंद्रावर लस मिळणार आहे.


सध्या सर्व वयोगटातील नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या स्वरूपात गर्दी करत आहेत. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर आणि लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी न करण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाकडून लस उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून लसीचा साठा उपलब्ध होताच नागरिकांना कळविण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी मुंबईत, बृहन्मुंबई महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे 63 केंद्रे तसेच खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 136 कोविड-19 लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कोविड प्रतिबंध लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे महानगरपालिका, शासकीय आणि खासगी कोविड लसीकरण केंद्रात आज 45 वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांचे लसीकरण होवू शकणार नाही.


दरम्यान, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे महापालिकेने जाहीर केलेल्या 5 केंद्रावर लसीकरण सुरु राहणार आहे. आज सकाळी 9 ते 9 या नियमित वेळेत लसीकरण सुरू राहणार असून या 5 केंद्रावर प्रत्येकी 500 नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे.


'या' 5 केंद्रावर लसीकरण सुरु राहणार



  1. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर)

  2. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)

  3. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर)

  4. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर)

  5. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर