Parambir Sing Letter LIVE UPDATES | परमबिर सिंह प्रकरण आणि राज्यातील राजकीय स्थितीचा अहवाल महाराष्ट्र प्रभारी काँग्रेस नेतृत्वाला दिल्लीला पाठवणार

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Mar 2021 07:39 PM
परमबिर सिंह प्रकरण आणि राज्यातील राजकीय स्थितीचा अहवाल महाराष्ट्र प्रभारी काँग्रेस नेतृत्वाला दिल्लीला पाठवणार

परमबिर सिंह प्रकरण आणि राज्यातील राजकीय स्थितीचा अहवाल महाराष्ट्र प्रभारी काँग्रेस नेतृत्वाला दिल्लीला पाठवणार. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी आज राज्यातील स्थितीबाबत आणि परमबिर सिंह प्रकरणाबाबत राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. पाटील यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर एच. के. पाटील आपला अहवाल केंद्रीय नेतृत्वाला पाठवणार.

काँग्रेस पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून

मुंबई : काँग्रेस पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. कमलनाथ झालेल्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी शरद पवार यांन भेटल्याची माहिती मिळत आहे. के. सी. वेणूगोपाल, एच. के. पाटील हे महाराष्ट्रातील बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे काँग्रेसचे लक्ष. 

गृह विभाग नेमकं कोण चालवतोय हे स्पष्ट नाही

 


शरद पवार म्हणतात प्रकरणाची चौकशी माजी डीजी रिबेरो यांनी करावी.  त्यांच्या बद्दल आदर आहे, मात्र कोणाची चौकशी करावी, परमबीर सिहांची की संपूर्ण प्रकरणाची?  आणि एक माजी डीडी आताच्या प्रकरणाची चौकशी करू शकतो का? या सरकारला वाचवण्यासाठी पवार साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली, ती म्हणजे सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न आहे. 


मुख्यमंत्री काहीच का बोलत नाही..


हे प्रकरणावर पांघरून घालण्यासारखे आहे.. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे... गृह विभाग नेमकं कोण चालवतोय हे स्पष्ट नाही, अनिल देशमुख की अनिल परब.. विधिमंडळात ही परब हेच गृह विभागाच्या मुद्द्यांवर बोलत होते. 

मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या आदेशाने वाझेंना सेवेत घेतले : फडणवीस

इंटेलिजन्स अधिकारी रश्मी शुक्ला यांनी तेव्हा काही फोन सर्विलेन्स वर लावले होते. त्यातून महत्वाची माहिती समोर आली होती.  मात्र काहीच केले गेले नाही, त्यामुळे रश्मी शुक्ला ही केंद्राच्या प्रतिनियुक्ती वर गेल्या. आज शरद पवार म्हणाले परमबीर यांनी त्यांच्या बदली नंतर आरोप केले, मात्र हे पहिल्यांदा लागलेले आरोप नाही..  या आधी सुबोध जयस्वाल आणि रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टवर कारवाई केली असती तर आज असे दिवस सरकार समोर आले नसते.. ला शरद पवार यांच्या बद्दल काही म्हणायचे नाही, कारण ते सरकारचे निर्माते आहे.. ते आपल्या सरकारवरील आरोपाबद्दल तसेच बोलले. वाझे यांना सेवेत घेताना समिती होती, त्यानी निर्णय घेतला. पवार हे अर्ध सत्य म्हणाले, त्यांनी हे नाही सांगितले की समितीने गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या आदेशाने वाझे यांना सेवेत घेतले. 

महाविकास आघाडीवर असे गंभीर आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही : फडणवीस

महाविकास आघाडीवर असे गंभीर आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. आधी DG सुबोध जयस्वाल यांनी ही पोलीस ट्रान्सफर रॅकेटबद्दल सरकार आणि मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट सादर केला पण त्यावर चौकशी केली नाही: देवेंद्र फडणवीस

परमबीर सिंह यांनी केलेले आरोप गंभीर, पण 100 कोटी कुठे गेले याचा उल्लेख पत्रात नाही : शरद पवार

परमबीर सिंह यांच्याशी माझी भेट झाली होती. परमबीर सिंह यांनी केलेले आरोप गंभीर, पण 100 कोटी कुठे गेले याचा उल्लेख पत्रात नाही. बदली झाल्यानंतर त्यांनी आरोप केले. 

या प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी द्यावीत: रविशंकर प्रसाद


वाझे कुणासाठी वसुली करत होते? 100 कोटी खंडणीची वसुली एका मंत्र्याची होती तर इतरांची किती होती? 100 कोटी रुपये एकट्या मुंबईतून आहे तर राज्यातून किती आहे? या प्रश्नांचं उत्तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी द्यावं अशी मागणी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी नाशिक भाजपचे आंदोलन

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजप आक्रमक झाले असून नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात हातात निषेधाचे फलक घेत आज सकाळी भाजपने आंदोलन करत ठाकरे सरकार भ्रष्ट आहे अशी घोषणाबाजी केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष, युवा आघाडी आणि महिला कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसुख हिरण हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक

मोठी बातमी : मनसुख हिरण हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक, एका माजी पोलिस कॉन्स्टेबलसह एका बुकीला अटक, हत्या प्रकरणाचं गूढ उकलल्याचा एटीएसचा दावा  https://www.youtube.com/watch?v=nTRdwxmeL4Q

 भारतीय जनता युवा मोर्चाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन

 


भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आंदोलन संविधान चौकावर सुरू असताना अचानकच भारतीय जनता युवा मोर्चाचे काही कार्यकर्ते सिविल लाइन्स परिसर मधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला सोबतच रस्त्यावर बसून धरणे आंदोलनही केले . गृहमंत्र्यांवर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत अचानक सर्व सुरक्षा व्यवस्था फोल ठरवत थेट गृहमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले आहे. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या सुमारे पंचवीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आणि आता सर्वांना पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले आहे

परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचवण्यासाठी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप खोटे - हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ यांची टीका,  परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचवण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे खोटे आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन आले आणि आज हे पत्र समोर आलं त्यामुळे संशय बळावला आहे. वाझे प्रकरणात परमबीर यांना माफीचा साक्षीदार करण्याचा यांचा प्रयत्न आहे.देशमुख यांना अडकवण्यासाठी व्हाट्सएपच्या माध्यमातून पुरावे तयार केले.

आबांच्याच पक्षाच्या गृहमंत्र्याने महाराष्ट्राच्या गृहखात्याला कलंकित केले - सुरेश धस

 


90 च्या दशकात पोलीसांचे मनोबल वाढवून कुख्यात गँगस्टरांचे रेकॉर्डब्रेक एन्काउंटर करुन मुंबईतील टोळीयुद्धांचा खात्मा करणारे स्व. लोकनेते गोपीनाथराव  मुंडे साहेब,डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेऊन तो न्यायालयात यशस्वीपणे टिकवणारे स्व. आर.आर.आबा, पाच वर्ष सक्षमतेने मुख्यमंत्रीपदासोबत गृहखाते निष्कलंक कारभार पाहणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडणवीस साहेब यांनी गृहमंत्री कसा असावा याचा आदर्श घालून दिला. परंतु स्व.आर.आर. आबांच्याच पक्षाच्या गृहमंत्र्याने महाराष्ट्राच्या गृहखात्याला कलंकित केले. सदरील प्रकरण अत्यंत गंभीर असून या बाबत मुख्यमंत्र्यांनी व पक्षाच्या प्रमुखांनी तात्काळ निर्णय घ्यावा, असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप खोटे : मंत्री हसन मुश्रीफ

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन आले आणि आज हे पत्र समोर आलं. त्यामुळे संशय बळावला आहे. वाझे प्रकरणात परमबीर यांना माफीचा साक्षीदार करण्याचा यांचा प्रयत्न आहे. डेलकर प्रकरण समोर आणलं त्यानंतर मुद्दाम भाजपने हे कारस्थान केलंय. संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये, अशी प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलीय.

राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

परमबीर सिंह यांचे पत्र म्हणजे सचिन वाझे आणि मनसुख हिरण प्रकणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जी कडक भूमिका घेतली त्यावर आलेली प्रतिक्रिया असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.

Parambir Singh letter | परमबीर सिंह पत्राप्रकरणी संजय राऊत म्हणाले....

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राप्रकरणी प्रतिक्रिया देत आपण काहीही पाहिलं नसल्यामुळे या विषयावर काहीही बोलणार नाही असं संजय राऊत म्हणाले. सदर प्रकरणात सरकारच्या संदर्भातील विषय असतील त्याबद्दल सरकार मधील लोक बोलतील. काय आरोप आहेत ते देखील आपल्याला ठाऊक नसल्याचं राऊत म्हणाले. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.



आकसापोटी असे आरोप होऊ शकतात : एकनाथ खडसे

आकसापोटी असे आरोप होऊ शकतात, चौकशीतून तथ्य समोर येतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादीच्या नेत्याने दिलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. 

अनिल देशमुख यांनी तातडीने गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : भाजप

परमबीर सिंह यांचे गृहमंत्र्यांवरील आरोपांनंतर भाजपने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावर एक मिनिटही राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल का बोलत नाही असा सवालही भाजपने विचारल. तसंच महाराष्ट्र सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असंही भाजपने म्हटलं आहे.

कुंपणच शेत खात असेल तर राज्यातील जनतेने कुठे न्याय मागायचा? : चित्रा वाघ

कुंपणच शेत खात असेल तर राज्यातील जनतेने कुठे न्याय मागायचा? असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला. सोबतच मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

परमबीर सिंह यांचं पत्र धक्कादायक, मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा : फडणवीस

"परमबीर सिंह यांचे पत्र धक्कादायक आणि खळबळजनक आहे. एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने असे पत्र गृहमंत्र्यांबद्दल लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी एक चॅटही जोडली आहे. गृह विभागात नियुक्ती किंवा बदलीबद्दल जे काही घडत होते त्याचा हा कळस आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. याची चौकशी झाली पाहिजे. मुंबई पोलीस दलाचं खच्चीकरण करणारी, मानहानी करणारी ही घटना आहे. गृहमंत्री पदावर राहातील तर चौकशी कशी होईल? कोणी छोट्या मोठ्या व्यक्तीने लावलेला आरोप नाही. एका डीजी रँकच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. पुरावा म्हणून चॅटही सोबत जोडलेलं आहे, तो पुरावाच आहे," असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे भ्रष्ट सरकार, वाझेंना कलेक्शनसाठी पुन्हा सेवेत घ्यायला लावलं : चंद्रकांत पाटील

परमबीर सिंह यांनी लेखी पत्राद्वारे म्हटले आहे की, अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना 100 कोटी जमा करायला सांगितले होते. त्यामुळे वाझेंना कलेक्शन घेण्यासाठी पुन्हा घ्यायला लावले गेले. यावर चंद्रकांत पाटील यांनी टीका करत आता हे स्पष्ट झाले आहे की हे सरकार भ्रष्ट आहे. संजय राऊत यांना गृहमंत्री पद द्या, असा घणाघाती आरोप चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार वर केला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. 

पार्श्वभूमी

मुंबई : मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप, गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं आढळल्याप्रकरणी एनआयएने एपीआय सचिन वाझे यांना अटक केली. त्यानंतर परमबीर सिंह यांचीही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली.


दोन दिवसांपूर्वी लोकमत आणि एबीपी माझाच्या मुलाखतीत गृहमंत्र्यांना मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी का केली असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अनिल देशमुख म्हणाले होते की, "परमबीर सिंह यांची बदली रुटीन नव्हती. एनआयएच्या तपासात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांकडून काही अक्षम्य चुका झाल्या ज्या माफ करण्यासारख्या नव्हत्या."  


याच मुलाखतीचा उल्लेख करत परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे की "सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावलं होतं. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकद एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 हजार 750 बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी 40-50 कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील, असं म्हणता येईल."  


अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले


दरम्यान परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, "मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे."


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.