पनवेलमध्ये घरात घुसून भरदिवसा सासू-सूनेची निर्घृण हत्या
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 10 Oct 2017 07:39 PM (IST)
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सीताबाई खुटले आणि अपर्णा खुटले या सासू सुनेचा जागीच मृत्यू झाला.
नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील नांदगावात भरदिवसा दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. दोन आरोपींनी घरात प्रवेश करुन सासू आणि सुनेची धारधार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नांदगावमधील गावाच्या एका टोकाला खुटले कुटुंबियांचं घर असून मागील बाजूला भात शेती आहे. दुपारी एक वाजताच्या सुमारास दोन इसम घरात घुसले. 30 वर्षीय अपर्णा मधुकर खुटले स्वयंपाकघरात काम करत होत्या. त्यावेळी एकाने त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले. यावेळी घरातच असलेल्या 75 वर्षीय सीताबाई रामदास खुटले यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावरही शस्त्राने वार केले. या हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सीताबाई खुटले आणि अपर्णा खुटले या सासू सुनेचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही हल्लेखोर घराच्या मागील दरवाजातून बाहेर पडून शेतातून पसार झाले. या घटनेची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच त्यांचे पथक तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली काही शस्त्रं ताब्यात घेतली आहेत. दोघींची हत्या केल्यानंतरही शरीरावर दागिने असल्याने चोरीचा प्रकार नसल्याचा अंदाज पोलिसांनी प्रथमदर्शनी वर्तवला आहे. दुहेरी हत्यांकाडाच्या घटनेमुळे दिवाळीच्या तोंडावर खुटले कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पोलिस हल्लेखोरांचा कसून शोध घेत असून अद्याप हत्याकांडाचे नेमके कारण समोर आलेलं नाही.