मुंबई: मुंबईवरुन पनवेलमार्गे लोकल ट्रेनने कर्जतला पोहोचण्याच्यादृष्टीने सुरु असलेल्या रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. या रेल्वेमार्गावरील सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या वावर्ले बोगद्याचे (wavarle tunnel) काम पूर्ण झाले आहे. हा बोगदा जून अखेरपर्यंत तयार होणार होता. मात्र, मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या काटेकोर नियोजनामुळे हे काम मुदतीआधीच पूर्ण झाले आहे. वावर्ले बोगदा हा पनवेल-कर्जत रेल्वे (Mumbai Panvel Railway) मार्गातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. वावर्ले बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे आता या रेल्वेमार्गाच्या कामाला आणखी गती येणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबईतील चाकरमन्यांना लोकल ट्रेनने (Local Train) पनवेलमार्गे कर्जत गाठता येणार आहे.


सध्या मध्य रेल्वेमार्गावरुन थेट कर्जतला लोकल ट्रेन जाते. मात्र, या नव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांना वाहतुकीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावरुन लोकल ट्रेन धावत नाहीत. या मार्गावर फक्त मालगाडी धावते. मात्र, पनवेल ते कर्जत लोकल ट्रेनसेवा या संपूर्ण पट्ट्यासाठी गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे पनवेल-कर्जत लोकल सेवा कधी सुरु होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. वावर्ले बोगद्याचे मुख्य काम पूर्ण झाले असून आता बोगद्यात इतर सुविधा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 


मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा


वावर्ले बोगदा खणायला न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. सध्या ठाणे-दिवा मार्गावर पारसिक बोगदा हा मुंबई महानगर परिसरातील सर्वाधिक लांबाची बोगदा आहे. मात्र, आता वावर्ले बोगदा हा सर्वाधिक लांबीचा ठरणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेमार्गाचे काम सध्या वेगात सुरु आहे. या मार्गावर नढाल, किरवली, आणि वावर्ले असे तीन बोगदे असणार आहेत. यापैकी नढाल बोगद्याची लांबी 219 मीटर, किरवली बोगद्याची लांबी 300 मीटर इतकी आहे.


पनवेल-कर्जत लोकल ट्रेनची सेवा सुरु झाल्यास काय फायदा होणार?


पनवेल-कर्जत हा दुहेरी रेल्वेमार्ग सुमारे 29.6 किमी लांबीचा आहे. या मार्गावर दोन उड्डाणपूल, आठ मोठे पूल, 36 लहान पूल उभारले जात आहेत. पनवेल ते कर्जत या पट्ट्यासाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे. कर्जत ते मुंबई आणि पुण्याला जोडणारे मुख्य ठिकाण आहे. मध्य रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेनने कर्जत ते मुंबईशी जोडले गेलेले आहे. मात्र, पनवेल ते कर्जत या भागात फक्त रस्ते वाहतूक हा पर्याय उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पनवेल आणि कर्जत या दोन्ही भागांमध्ये लोकवस्ती मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. परिणामी पनवेल ते कर्जत लोकल ट्रेनची सेवा सुरु झाल्यास स्थानिक नागरिक आणि मुंबईतील चाकरमन्यांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. याशिवाय, कर्जत आणि पनवेल पट्ट्यातील लहान गावांमधील लोकांना नोकरी आणि अन्य कामांसाठी मुंबई गाठणे सोपे होणार आहे. 


आणखी वाचा


मुंबई, नवी मुंबई ते कल्याण - बदलापूर प्रवास होणार गतिमान! प्रवाशांचा वेळ वाचणार, लवकरच नवीन मार्गाचा आराखडा तयार होणार