मुंबई : उद्धव ठाकरे आणि आमचे संबंध हे पक्षाच्या पलिकडचे आहेत. आज मी त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते, असे स्पष्टीकरण महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक घेतली. या बैठकीबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीसंबंधी पंकजा यांनी माध्यमांना माहिती दिली.

पंकजा म्हणाल्या की, आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केलेली नाही. मी भाजपची मराठवाड्याची समन्वयक आहे. मराठवाड्यात उद्या मुख्यमंत्री आणि उद्धव यांची सभा आहे. या सभेच्या नियोजनाबाबत चर्चेसाठी मी मातोश्रीवर आले होते. तसेच उद्धव ठाकरे आणि आमचे संबंध हे पक्ष आणि राजकारणाच्या पलिकडचे आहेत. आपण सध्या लोकसभेला सामोरे जात आहोत. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते.

विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आप-आपल्या लोकसभा उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. परंतु शिवसेना भाजपच्या उमेदवारांच्या याद्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. याचदरम्यान महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

व्हिडीओ पाहा



गेल्या काही दिवसांपासून जालना लोकसभेच्या जागेबाबत अर्जुन खोतकर आग्रही आहेत. परंतु जालना मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या खासदार आहेत. ही जागा भाजपची आहे. तरीदेखील अर्जुन खोतकरांना या मतदार संघातून निवडणूक लढायची आहे. त्यामुळे आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत जालन्याच्या जागेबाबत काय चर्चा झाली हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.