मुंबई : गोपीनाथ गडावर नाराजी उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडेंची अजूनही नाराजी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेऊन स्थापन केलेल्या सरकारमुळं आनंद झाला नव्हता, असं म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हा माझ्यासाठी एक धक्का होता असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर एखाद्या पदासाठी पंकजा मुंडे दबावतंत्राचा वापर करत असल्याच्या आरोपावरही पंकजा मुंडेंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आपल्याला पुन्हा एकदा शुन्यातून सुरुवात करायची असल्यानंच आपण कोअर कमिटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं पंकजा म्हणाल्या. आपण पक्षवाढीसाठी संघर्ष यात्रा काढली. शेकडो सभा घेतल्या. पण आता पुन्हा एकदा स्वत:ची ताकद जोखायची असल्यानं शून्यातून सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.


देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार बनवण्यासंबंधी प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, राज्य राष्ट्रपती राजवटीतून बाहेर पडले त्याचा मला आनंद झाला होता. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी अभिनंदन केलं. पण मला या सरकार स्थापनेने फार आनंद झाला नाही. माझ्यासाठी तो धक्का होता. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या गनिमी काव्याची कल्पना होती का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मला काहीच कल्पना नव्हती. पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य असली तरी मला त्या निर्णयाबद्दल काही माहित नव्हते. जेव्हा मी शपथविधी पाहिला तेव्हा तो माझ्यासाठी सुद्धा धक्का होता असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

मला शून्यावर जाऊन पुन्हा काम करायचंय
माझ्यावर अशी टीका होते की वडिलांमुळे मला हे सगळं मिळालं. त्यामुळं मला शून्यावर जाऊन पुन्हा काम करायचं आहे. मला आता स्वतःला पाहायचं आहे. मी किती मुंडे साहेबांमुळं आहे आणि किती स्वत:च्या कामामुळं. मी स्वतःला आधीच सिद्ध केलं आहे मात्र पुन्हा शून्यावर जाऊन काम करुन स्वत:ला सिद्ध करायचं आहे, अशा भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. मुंडे यावेळी म्हणाल्या की, मी नाराज नाहीच. मला आता स्वतःला पाहायचं आहे. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांचं उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या की अमिताभ बच्चन यांच्या मुलांनी कितीही चांगला अभियान केला तरी त्याला अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे हीच ओळख मिळते, असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, मी आमदार झाले नाही पण माझ्यामुळे अनेक आमदार झाले याचा आनंद आहे. मी फेसबुकवर पोस्ट लिहिली त्यावेळी माजी मंत्री लिहू नका असं मी सांगितलं होतं. ट्विटर हँडलवर कधी कमळ नव्हतं, त्यामुळं कमळ त्यावेळीच नव्हतं असं म्हणणं चूक आहे. त्यावेळी माझ्या मनात खदखद नव्हती, आता आपण आमदारही नाहीत. त्यामुळं पुढे काय करायचं हे ठरवायचं होतं त्यासाठी ती पोस्ट लिहिली होती, असे त्या म्हणाल्या. मी पक्ष सोडण्याच्या वावड्या का कुठल्या माहिती नाही, मी आजिबात तणावाखाली नाही पण अस्वस्थ आहे. मी पॉवर गम खेळतेय असं वातावरण तयार झालं. मी दबाव तयार करतेय अशी चर्चा झाली, असे त्या म्हणाल्या.