महिलांकडून गैरवापरामुळे पॅनिक बटण काढण्याची तयारी?
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2016 03:51 AM (IST)
मुंबई : लोकलमधून महिला डब्यात प्रवास करताना संकटकाळी मदत व्हावी म्हणून रेल्वे प्रशासनाने 'पॅनिक बटण' गेल्याच आठवड्यात सुरु केलं. मात्र या प्रायोगिक योजनेचाच गैरवापर होत असल्याचं लक्षात आल्याने रेल्वे पुनर्विचाराच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवासाठी रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर ‘पॅनिक बटण’ सुरु केलं. मात्र गेल्या आठवड्यात दोन वेळा त्याचा गैरवापर झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याचा पुनर्विचार करण्याची भूमिका रेल्वेने घेतली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या एका लोकलमध्ये महिलांच्या पाच डब्यांत पॅनिक बटण बसवण्यात आलं आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर अन्य लोकलमध्ये ही सुविधा देण्याचा रेल्वेचा मानस आहे. महिलांना रेल्वे डब्यात जर असुरक्षित वाटत असल्यास किंवा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या हे बटण दाबून तात्काळ मदत मिळवू शकतात. मध्य रेल्वेवर गेल्याच आठवड्यात सलग दोन दिवस वाशी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकांमध्ये लोकल आली असता महिलांच्या डब्यातून या पॅनिक बटणाचा वापर करण्यात आला. मात्र महिला प्रवाशांना कोणताही धोका नसताना त्याचा गैरवापर झाल्याचे समोर आले.