कल्याण : सुमारे अडीच तासांच्या खोळंब्यानंतर पंचवटी एक्स्प्रेस कल्याणवरुन रवाना झाली. नाशिककडून मुंबईकडे येणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसचं कपलिंग तुटल्याची घटना आज कल्याण रेल्वे स्थानकाजवळ घडली होती. यामुळे इंजिन तीन डबे घेऊन पुढे निघून गेलं, तर उरलेले डबे मागेच राहिले होते.

आज सकाळी साडेनऊच्या सुमारास पंचवटी एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकातून पुढे निघाली. मात्र पत्री पुलाजवळ अचानक तिसऱ्या आणि चौथ्या डब्याचं कपलिंग तुटलं आणि इंजिन तीन डब्यांना घेऊन पुढे निघालं. ही गोष्ट लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. या गाडीच्या मागे मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लोकल आणि एक्स्प्रेसही अडकून पडल्या. तर खोळंबलेल्या प्रवाशांना दुसऱ्या गाड्यांनी पुढे पाठवण्यात आलं.

डबे मागे सोडून पंचवटी एक्स्प्रेसचं इंजिन पुढे गेलं, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

तब्बल अडीच तासांच्या खोळंब्यानंतर गाडी पूर्ण जोडून पुढे रवाना करण्यात आली. मात्र यामुळे रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी प्रवाशांनी केली आहे.

गेल्या वर्षी पंचवटी एक्स्प्रेसला एलएचबी डबे मिळाले होते. त्यावेळी अशीच घटना घडली होती. तेव्हा डबे मागे सोडून इंजिन पुढे गेलं होतं. आज पुन्हा या प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. मात्र यावेळी इंजिनासोबत तीन डबेही होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. परंतु यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.