विरार : मुंबईजवळच्या विरारमधील विकास झा यांच्या आत्महत्येला अडीच महिन्याचा कालावधी उलटला असतानाच त्याच्या धाकट्या भावानेही आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमित विनय झा याने विषप्राशन केलं.
10 नोव्हेंबर 2017 रोजी विकास झा या तरुणाने वसईच्या उपविभागीय कार्यालयात स्वतःवर केरोसीन ओतून जाळून घेतलं होतं. पोलिसांच्या त्रासाला आणि सामाजिक कार्यकर्ते मुनाफ बलोच यांच्या मानसिक जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विकासच्या कुटुंबीयांनी केला होता.
आपल्या भावाला न्याय मिळावा म्हणून विकासचा धाकटा भाऊ अमित झा गेल्या अडीच महिन्यांपासून पोलिसांकडे हेलपाटे घालत होता. पण पालघर पोलिस भावाला न्याय देत नसून उलट चौकशीच्या नावाखाली मानसिक त्रास देतात, असा आरोप करत अमित झा यानेही औषध प्यायलं. अमितला दादरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र सोमवारी सकाळी सात वाजता त्याचाही मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी त्यानेही एक व्हिडिओ बनवला असून त्यात विरारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख आणि सामाजिक कार्यकर्ते मुनाफ बलोच यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचा दावा अमितने केल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.