होय आम्ही कुत्रे आहोत : हितेंद्र ठाकूर
एबीपी माझा वेब टीम | 25 May 2018 06:00 PM (IST)
शिवसेना आणि भाजप यांनी कुत्रे-मांजर संबोधल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
विरार : पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकांच्या रणसंग्रामाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना आणि भाजप यांनी कुत्रे-मांजर संबोधल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या पालघरमध्ये पातळी सोडून प्रचार सुरु आहे. होय आम्ही कुत्रे आहोत. तीस वर्षांपासून वफादार कुत्र्यासारखं लोकांबरोबर, मतदारांबरोबर आम्ही इमानदार आहोत. असंही हितेंद्र ठाकूर यांनी दरडावून सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने शिवसेना आणि भाजपची वरिष्ठ नेते मंडळी पालघरमध्ये ठाण मांडून आहेत. सर्व पक्ष वसई-विरारमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांना टार्गेट करताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हितेंद्र ठाकूरांना कुत्रा-मांजर संबोधून टीका केली होती. त्यावर ठाकूरांनी उत्तर दिलं. पालघर पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांना शिवसेना-भाजपपेक्षा 'शिटी'ची सीट आल्याचं चालेल. शिवसेनेला भाजपची सीट आलेली चालणार नाही आणि भाजपला शिवसेनेची सीट आलेली चालणार नाही. त्यामुळे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते आमच्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करणार असल्याचा दावाही ठाकूरांनी केला.