पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी भूकंपग्रस्तांना कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी भूकंपग्रस्त भागाची पाहणी करताना सांगितले असून महाराष्ट्र राज्य मंत्रालय भूकंप व पुनर्वसन मंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिव यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून 5 कोटींची मागणी करत सदरहू भागाची पाहणी करण्याची विनंती केली आहे.


दरम्यान आमदार निकोले यांनी सतत होत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक भयभीत होत असल्याने डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, पुंजावे, चिंचले येथील भूकंपग्रस्त घरांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी भूकंपग्रस्तांना मदत म्हणून अन्नधान्याचे वाटप केले. तसेच त्यांना धीर देत लवकरात लवकर शासनाकडून नुकसान भरपाई, टेन्टची संख्या वाढवणे तसेच इतर समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.


पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सहा धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल भाग आहे. त्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात सतत भूकंपाचे धक्के होत अजून त्याची तीव्रता ही 3.5 पेक्षा अधिक व त्या दरम्यान आहे. परिणामी गोरगरीब आदिवासींच्या घरांना तडे गेले आहेत तर अनेक जण पूर्णतः बेघर झाले आहेत. भूकंपामुळे संपूर्ण जिल्हा भीतीच्या छायेखाली वावरत आहे. त्यातच कोरोनामुळे आदिवासी बंधू-भगिनी दुहेरी संकटात सापडले आहेत.


त्यामुळे राज्य सरकार कडून ही मदत अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील भूकंपग्रस्तांसाठी तात्काळ 5 कोटी निधी देवून भूकंप व पुनर्वसन मंत्र्यांनी सदर भागाचा पाहणी दौरा करावा, अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी केली आहे. तसेच डहाणू व तलासरी येथील तहसीलदार यांना भूकंपग्रस्त भागाचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.


पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात नागरिकांना कोरोनासोबत भूकंपाच्या सावटाखाली जगावं लागत आहे. या परिसरात 2018 पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. मध्यंतरी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र गेल्या महिना भरापासून पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे.