निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी याबाबत माहिती दिली. मतदान सोमवार 28 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, तर मतमोजणी 31 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.
या पोटवडणुकीसाठी 12 हजार 894 कर्मचारी, तसेच 4 हजार 219 सुरक्षा कर्मचारी कार्यरत राहणार आहे.
पालघर जिल्ह्यातील 2097 केंद्रांपैकी 14 केंद्रांना संवेदनशील असे नमूद करण्यात आलं आहे. या केंद्रांकडे शासकीय यंत्रणेचं अधिक लक्ष राहणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
तालुकानिहाय मतदान केंद्र
पालघर लोकसभा क्षेत्रातील डहाणू विधानसभा क्षेत्रात 327, विक्रमगडमध्ये 328, पालघरमध्ये 318, बोईसरमध्ये 338, नालासोपारामध्ये 449, तर वसई विधानसभा क्षेत्रात 327 मतदान केंद्र आहेत.
संवेदनशील मतदान केंद्र
यापैकी डहाणूमधील पतीलपाडा (63), बोईसरमधील बोईसर (34), धोंडीपूजा (85), खैरपाडा (294) तसेच वळीवमधील तीन केंद्र, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण 14 केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 9 उपविभागीय पोलीस अधिकारी, 18 पोलीस निरीक्षक, 182 पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार 602 पोलीस शिपाई, 495 नवीन भरती झालेले पोलीस, एक हजार 117 होमगार्ड आणि 46 नागरी सुरक्षा विभागाचे स्वयंसेवक याना तैनात करण्यात आले आहेत. मतदानासाठी दोन हजार 737 मतदान केंद्र अध्यक्ष, 7 हजार 737 मतदान अधिकारी आणि दोन हजार 308 शिपाई यांचा फौजफाटा कार्यरत राहणार आहे.
मतमोजणीची तयारी
सर्व मतदारांना 2097 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत मतदार चिठ्ठ्यांचे ( Voter Slip) वाटप करण्यात येत आहे. मतदान झाल्यानंतर EVM आणि VVPAT मशिन संबधित विधानसभा मतदारसंघ मुख्यालयाच्या स्टाँग रुममध्ये जमा करण्यात येतील. त्यांनतर कडक पोलीस बंदोबस्तामध्ये हे मशिन पालघर येथील सुर्या कॉलनीमधील जिल्हा स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात येतील.
पालघर येथे 31 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीला सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी 14 असे एकूण 84 मोजणी टेबल मांडण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबलवर सुपरवायझर, सहाय्यक आणि मायक्रो ऑब्झर्वर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे 600 अधिकारी - कर्मचारी कार्यरत असतील, अशी माहिती नारनवरे यांनी दिली.
पालघर पोटनिवडणूक
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.
शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.