पालघर : मेहुण्याच्या हातातील बंदुकीतून चुकून गोळी सुटून भावोजीचा मृत्यू झाल्याचा प्रकार पालघरमध्ये घडला आहे. बोईसर पोलिसांनी या प्रकरणी कलम 304 अंतर्गत गुन्हा नोंदवत मेहुणा लहान्या भोईरला (वय 25 वर्ष) अटक केली आहे.

हरी बच्चू गडग (वय 39 वर्ष)हे पत्नी आणि मुलासह बोईसरमधील शिगाव सुमडीपाडा इथल्या सासुरवाडीत दिवाळी साजरी करण्यासाठी गेले होते. शुक्रवारी रात्रीचं जेवण झाल्यावर मेहुणा लहान्या सदू भोईर एका खोलीमध्ये गप्पागोष्टी करत होते. यावेळी घरात असलेली बंदूक उत्सुकतेने दाखवताना, चुकून खटका दाबला गेल्याने, गोळी थेट हरी गडग यांच्या छातीत घुसली. या त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हा प्रकार घडल्यानंतर काही सुचनासे झाल्यामुळे त्यांचा मृतदेह रात्रभर तिथेच होता. यानंतर हरी यांचा पुतण्या सागर गडगने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर, आरोपी लहान्या भोईरला अटक केली.

महत्त्वाचं म्हणजे ही बंदूक अनधिकृत होती. ती कुठून आणली, याबाबतची चौकशी पोलिसांनी भोईरकडे केली. ही बंदूक रोहित जयराम तांबडा याची असल्याची सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन, बंदूक हस्तगत केली.

पोलिसांनी आरोपी लहान्या भोईर आणि रोहित जयराम तांबडा या दोघांवर भारतीय दंड विधान कलम 304 सह आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पालघर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना 16 नव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.