मुंबई : मंत्रालयात दुषित पाण्यामुळे शेकडो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


शुक्रवारी सकाळपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत मंत्रालयातील 100 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी उलट्या आणि जुलाबाच्या त्रासामुळे मंत्रालयातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असून ही संख्या वाढत आहे. उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याने अधिकारी/कर्मचारी कार्यालय सोडून घरी निघून जात आहेत.


मंत्रालयातील पिण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या दुषित पाण्यामुळे हा त्रास होत असल्याचे स्पष्ट झालं आहे. मंत्रालयात पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत असून त्याबाबतच्या तक्रारी होऊनही पिण्याच्या पाण्याच्या दर्जामध्ये काहीही फरक पडला नाही.


मंत्रालयामध्ये हजारोच्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. महाराष्ट्राच्या विविध भागातून रोज वैयक्तिक व सार्वजनिक कामासाठी सर्वसामान्य लोक मंत्रालयात येत असतात. तरीही पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. राज्याच्या मुख्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याची ही परिस्थिती चिंताजनक आहे.


मंत्रालयात कालपासून दूषित पाणी येत आहे. मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी सॅम्पल नेले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर नेमका प्रकार काय आहे कळेल, मात्र हा प्रकार गंभीर आहे, असं मंत्रालयातील राजपत्रित अधिकारी संघाचे सरचिटणीस विष्णू पाटील यांनी म्हटलं.


VIDEO | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा