Navneet Rana and Ravi Rana : नवनीत राणा (Naneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 12 दिवस तुरुंगात काढल्यानंतर सुटेकनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर आगपाखड करणं राणा दाम्पत्याला महागात पडण्याची चिन्ह आहेत. जामीन का रद्द करु नये? असा प्रश्न विचारत मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) राणा दाम्पत्याला प्रश्न विचारला आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करावा म्हणून सराकरी वकिलांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर आज सुनावणी पार पडली त्यावेळी न्यायालयानं राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. यावर बोलताना टीकेला उत्तर देणं हा आमचा घटनात्मक आधिकार, आम्ही कोर्टाच्या अटींचं उल्लंघन केलेलं नाही, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे. तर,
आमदार रवी राणा बोलताना म्हणाले की, "मला असं वाटतं की, संविधानानं आम्हाला काही अधिकार दिले आहेत. आमचं मत मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. कोर्टानं जे आदेश दिले होते, त्यांचं आम्ही पालन करत आहोत. कुठेही आम्ही कोर्टानं दिलेल्या अटींचं उल्लंघन केलेलं नाही. आमच्या विरोधात मुख्यमंत्री इतर नेत्यांच्या माध्यमातून आरोप करत आहेत. या आरोपांना उत्तर देणं हा आमचा अधिकार आहे."
राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाची नोटीस
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला होता. पण जामीनासाठी घालण्यात आलेल्या अटींचा भंग झाल्याचा दावा करत सरकारी वकीलांना राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी आज सत्र न्यायालयात करत अर्ज दाखल केला. यासंदर्भात आज सुनावणी पार पडली. त्यावेळी जामीन का रद्द करु नये? असा प्रश्न विचारत मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याला प्रश्न विचारत नोटीस बजावली आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. यामध्ये माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अटींचा भंग केल्याची तक्रार सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सत्र न्यायालयात केली.
राज्य सरकारच्या अर्जात काय?
राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जानुसार, या दोन्ही आरोपींनी जामीन अटींचा भंग केला आहे. राणा यांनी माध्यमांशी बोलताना हनुमान चालिसेसाठी 14 दिवसच काय 14 वर्षांचा तुरुंगवासही सहन करण्याची तयारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्याशिवाय, मला तुरुंगात डांबल्याचा परिणाम तुम्हाला (उद्धव ठाकरे) सहन करावा लागणार आहे. राम आणि हनुमान यांना विरोध केल्यास काय होऊ शकतं हे तुम्हाला कळेल. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही ठिकाणांहून निवडणूक लढवावी, मी तुमच्यासमोर निवडणुकीस उभी राहणार असल्याचे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले होते. त्याशिवाय इतरही वक्तव्ये केले होते. या वक्तव्यांमुळे जामीन अटींचा भंग होत असल्याची तक्रार सरकारने कोर्टासमोर केली. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करून त्यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट काढण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली.