मुंबई : गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक संकटांचा सामना केला. विरोधकांनी हे सरकार अस्थिर करण्यासाठी अनेक अघोरी प्रयोग केले. पण या सगळ्याला पुरुन उरुन एक वर्षाचा कालखंड या सरकारने यशस्वीरित्या पूर्ण केला, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं. दिवाळीनिमित्त मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी दीपावलीच्या शुभेच्छा देत विरोधकांवर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले की, "आज नरकचतुर्दशी आहे. परंपरेनुसार आज नरकासुराचा वध केला जातो. महाराष्ट्र आणि सरकारसाठी मंगल आणि शुभ दिवस आजपासून सुरु होतोय. पुढील चार वर्ष फक्त महाराष्ट्राचा विकास आणि जनतेचं कल्याण अशा पद्धतीने या सरकारचं काम राहिल, असं मला उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातून जाणवतं. पुढील चार वर्ष महाराष्ट्र आणि देशाचं काम करु. राज्यातील प्रत्येकाला वाटलं पाहिले हे माझं सरकार आहे, माझे मुख्यमंत्री आहेत."

ऑपरेशन कमळ होणार असं विरोधकांकडून वारंवार सांगितलं जातं यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. "या राज्यात आता कोणतेही ऑपरेशन होणार नाही. विरोधकांनी वर्षभरात अनेक ऑपरेशन्स करण्याचे प्रयत्न केले. पण सरकारला कुठेही खरचटलं नाही. त्यामुळे त्यांनी आता ऑपरेशनची भाषा बंद करायला हवी. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पुढील चार वर्ष सरकारला सहकार्य करण्याची त्यांची भूमिका असायला हवी. पुढे निवडणुकीत काय निकाल लागेल तेव्हा बघू काय करायचं."

महाराष्ट्राचं सरकार पुढील पाच वर्ष स्थिरच राहिल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील याविषयी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कोणतीही शंका नसेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

किरीट सोमय्यांकडे त्यांचा पक्षही गांभीर्याने पाहत नाही : संजय राऊत
भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या काही नेत्यांवर सातत्याने आरोप करत आहेत. आजही त्यांनी ट्विटरवरुन दिवाळीच्या शुभेच्छा देताना शिवसेनेला उपहासात्मक टोला लगावला. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, आम्ही बोलावं असं महान कार्य त्यांनी (किरीट सोमय्या) केलं नाही. ते माजी खासदार आहेत. त्यांनी त्यांचं काम करावं. ते जे काम करतात त्याकडे त्यांचा पक्षही गांभीर्याने पाहत नाही. शेवटी विरोधकांनी टीका करावी, पण आपण जे करतो त्यामुळे आपलाच पक्षा गाळात जातो, आपल्याच पक्षावरचा विश्वास उडतो याचं भान ठेवावं. महाराष्ट्रात उत्तम विरोधीपक्ष असावा, त्याने विधायक काम करावा ही आमची भूमिका आहे."

जुनी थडगी आम्हीही उकरु शकतो पण...
केंद्र सरकारकडून अनेक राज्यांमध्ये ज्याप्रकारे विरोधी पक्षांचं दमन सुरु आहे, अशी भूमिका आम्ही विशेषत: उद्धव ठाकरे यांनी कधीच घेतली नाही. बाळासाहेबही कधी घेत नव्हते. त्यामुळे खोटेनाटे आरोप करणं बंद करावी. जुनी थडगी उकरण्याची म्हटली तर ती आम्ही उकरु शकतो. पण मागचं विसरुन पुढे जावं अशी आमची भूमिका आहे. थडक्यामध्ये हात घालत बसलात तर त्यामध्ये तुमच्यात पापाचे, तुमच्याच भ्रष्टाचाराचे सांगाडे मिळतील.