मुंबई : मुंबई महापालिकेच्या 'एफ उत्तर' विभागातील 'पाच-उद्यान' परिसराजवळील एका 'मॅनहोल'चं झाकण अनधिकृतपणे उघडं असल्याचं काल आढळून आलं. किमान दोन व्यक्तींनी विशिष्ट प्रकारचा 'आकडा' हा ठराविक पद्धतीने वापरल्यानंतर हे झाकण उघडता येतं. तसेच कामाच्या आवश्यकतेनुसार केवळ महापालिका कर्मचारीच हे झाकण उघडू शकतात.
कोणत्याही परिस्थितीत हे झाकण उघडताना त्याच्या जवळ इशारा देणारा फलक वा झेंडा लावणे, तसेच महापालिकेचे कर्मचारी काम होईस्तोवर तेथे उभे असणे बंधनकारक आहे. मात्र झाकण उघडण्याच्या कालच्या घटनेबाबत विशिष्ट हेतूने समाज विघातक प्रवृत्तींनी हे झाकण उघडलं असण्याचा संशय असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे.
या अनुषंगाने महापालिकेच्या 'एफ उत्तर' विभागाद्वारे माटुंगा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती 'एफ उत्तर' विभागाचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांनी दिली.
महापालिकेच्या 'एफ उत्तर' विभागात माटुंगा, शीव, वडाळा प्रतिक्षा नगर, ऍन्टाप हिल यांसारख्या महत्त्वाच्या परिसरांचा समावेश होतो. यापैकी माटुंगा परिसरात पाच उद्यानाजवळील (Five Garden) नानालाल मेहता उड्डाणपुलाखाली आणि भूखंड क्रमांक 595 च्या जवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पर्जन्यजल वाहिन्या खात्याच्या जलवाहिनीवरील एक मॅनहोल आहे.
या मॅनहोलचं झाकण सात जून रोजी संशयास्पदरित्या उघडं असल्याचं आढळून आलं. मॅनहोलचं उघडं झाकण नागरिकांच्या जिवितास धोकेदायक ठरु शकतं. सुमारे तीन फूट x दोन फूट एवढा आकार असणाऱ्या या मजबूत आणि वजनदार लोखंडी झाकणाची जाडी 25 मिमी (सुमारे एक इंच) एवढी आहे.
गेल्या वर्षीच्या मुंबईतील पावसात उघड्या मॅनहोलमध्ये पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा नाहक बळी गेला. मात्र कालच्या पावसातही मॅनहोलची अवस्था पुन्हा समोर आली. माटुंगा सर्कल भागात पावसामुळे झाकण उघडं झालं आणि जवळपास दोन तास हे झाकण उघडं असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी जवळच्या गार्डनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.
आपलं काम सोडून कर्मचाऱ्यांनी मॅनहोलच्या कडेने गाड्या लावल्या. महापालिका कर्मचाऱ्यांची वाटही पाहिली, मात्र शेवटी कर्मचाऱ्यांनी स्वतःच झाकण लावून टाकलं. अखेर महापालिकेने या प्रकाराची नोंद घेत पोलिसात तक्रार केली आहे.
मॅनहोलचं झाकण उघडणाऱ्यांवर आता कारवाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jun 2018 11:11 PM (IST)
कोणत्याही परिस्थितीत हे झाकण उघडताना त्याच्या जवळ इशारा देणारा फलक वा झेंडा लावणे, तसेच महापालिकेचे कर्मचारी काम होईस्तोवर तेथे उभे असणे बंधनकारक आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -