मुंबई : मातोश्रीवर भेटायला आलेला शेतकरी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आला होता. शेतकऱ्यांना न्याय फक्त भाजपच देऊ शकतो. म्हणून मी येथे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आल्याचं महेंद्र देशमुख या शेतकऱ्याने फडणवीस यांची भेट घेतल्यावर सांगितलं. देशमुख ह्या शेतकऱ्यावर मातोश्री बाहेर मुख्यमंत्री यांच्या भेटीदरम्यान पोलिसांकडून अन्याय झाला होता, अशी चर्चा होती. हा विषय चर्चेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती.


ठाकरे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी सांगितलं होतं. परंतु, कृषी मंत्री आणि तहसीलदार, बँक अधिकारी यांच्याशी खूप दिवस चर्चा करूनही हा विषय मार्गी न लागल्याने शेवटी शेतकरी महेंद्र देशमुख आपल्या लहान मुलीसह आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आले होते. या भेटीने त्यांचे समाधान झाल्याचे त्यांनी सांगितलं. मला न्याय विरोधी पक्षनेतेच देऊ शकतील, असंही ते म्हणाले. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय फक्त भाजप देऊ शकतं, असं आमदार राम कदम यांनी देशमुख यांच्या बोलण्यानंतर म्हटलं.

मातोश्रीबाहेरुन शेतकऱ्याला घेतलं होत ताब्यात -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या महेंद्र देशमुख या शेतकऱ्याला लहान मुलीसह पोलीसांनी ताब्यात घेतलं होतं. आपल्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यांना भेटण्यास नकार देत पोलीसांनी ताब्यात घेतले. ही घटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समजताच त्यांनी शेतकऱ्याची दखल घेतली. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याला तत्काळ सोडण्याचे आदेश देत समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं होतं.

देवेंद्र फडणवीसांची टीका -
या घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होतोच आहे. पण अवघ्या 8 वर्षांच्या लहान मुलीला 'मातोश्री'बाहेर अशी वागणूक मिळत असेल, तर राज्यातील जनतेने अपेक्षा करायची तरी कुणाकडून? मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची दखल घ्यावी, असं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

Candy Crush | शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी; ओपन करताच सुरु होतो कँडीक्रश | ABP Majha