कल्याण : दुकानात जाऊन वस्तू घेण्यापेक्षा सध्या ऑनलाईन शॉपिंगच्या ट्रेंड आहे. मात्र ऑनलाईन शॉपिंगमध्ये रिस्कही तेवढीच आहे. ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार दररोज समोर येत आहेत. कल्याणमध्ये एका तरुणाला अशाच पद्धतीने गंडा घालण्यात आला आहे. महागडा फोन मागवल्यानंतर तरुणाला प्रत्यक्षात पत्त्यांचा कॅट हाती आल्याचा प्रकार घडला आहे.


त्रैलोकी पांडे असं या तरुणाचं नाव असून तो कल्याणच्या चिकणघर परिसरात वॉचमन म्हणून काम करतो. 12 जुलै रोजी त्याला एका महिलेचा फोन आला, ज्यात तिने तुमच्या नंबरवर स्पेशल ऑफर असून 16 हजाराचा फोन अवघ्या साडेचार हजारात मिळणार असल्याचं सांगितलं. सोबत घड्याळ आणि गॉगल मोफत मिळणार असल्याची बतावणीही तिने केली.


या आमिषाला भुलून पांडे याने मोबाईलची ऑर्डर दिली. 24 जुलै रोजी स्पीडपोस्टने त्याचं पार्सल त्याच्या हाती आलं, ज्याचे त्याने साडेचार हजार रुपये भरले. मात्र हे पार्सल उघडताच त्याला धक्का बसला. कारण यात मोबाईल नव्हे, तर चक्क पत्त्यांचा कॅट आणि कमरेचा पट्टा निघाला.


याबाबत पोस्टात विचारलं असता त्यांनी आमचं काम फक्त पार्सल पोहोचवणं इतकंच असल्याचं सांगत जबाबदारी घ्यायला नकार दिला. तर संबंधित महिलेच्या नंबरवर पुन्हा फोन केला असता फोन उचलून कट करण्यात आला आणि नंतर स्विच ऑफ करण्यात आल्याचं त्रैलोकीने सांगितलं. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करणार असून दोषींवर कारवाईची मागणी त्रैलोकी पांडे याने केली आहे.