वसई : क्विकर डॉट कॉम या कंपनीच्या माध्यमातून घरकाम करण्यासाठी पूर्णवेळ विश्वासू नोकर देण्याचे अमिश दाखवून, विविध राज्यातील शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विरारच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीमधील दोन जणांना गजाआड केले आहे.
कानपूर, हैदराबाद, बंगळुरु, दिल्ली, नागपूर, पुणे, शिमला, वाराणसी यासह अन्य राज्यातील 150 पेक्षा जास्त लोकांची या टोळीने आर्थिक फसवणूक केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यापैकी 2 जणांना अटक केली असून, त्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
राज जयप्रकाश सक्सेना आणि अर्जुन सत्यनारायण नाईक अशी अटक आरोपींची नावे आहेत. राज हा विरार ग्लोबल सिटी येथे तर अर्जुन हा सांताक्रूझ येथे राहतो. या दोघांनी आयकॉन मेड सर्व्हिस आणि समर्थ इंटरप्राइजेस नावाच्या दोन कंपन्यांची 2 महिन्यांसाठी क्विकर डॉट कॉमवर नोंदणी केली होती. या नोंदणीच्या आधारे पूर्णवेळ घरकाम करण्यासाठी नोकर देत असल्याची जाहिरात टाकली होती. या जाहिरातीद्वारे हे दोघे लोकांची फसवणूक करत होते.
ऑनलाइन नोकर देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारे रॅकेट विरार मध्ये कार्यरत असल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना मिळाली होती. त्याच्या आदेशावरून विरार स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी त्याचा तपास करून राज सक्सेना या आरोपीला 24 नोव्हेंबर रोजी विरारमधून ताब्यात घेतले.
सक्सेना याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर मेड सर्व्हिसच्या नावाखाली देशभरातील अनेक लोकांची सक्सेना याने आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर अर्जुन नाईक याला 28 नोव्हेंबर रोजी सांताक्रूझ येथून ताब्यात घेतले. या दोघांच्या चौकशीत फसवणुकीचे रॅकेट बाहेर आले आहे.