ठाणे : गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनाच्यावेळी गर्दी होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीचा नागरिकांनी अवलंब करावा असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रत पहिल्यांदाच गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन ऑनलाइन पद्धतीने ठाण्यात या वर्षी केले जाईल. यासाठी महापालिकेच्या डीजीठाणे प्रणालीच्या माध्यमातून ॲानलाईन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.


गणेशोत्सव जवळ आल्यामुळे राज्य सरकारच्या आवाहनानुसार ठाणे महानगरपालिकेने देखील हा उत्सव सर्वांनी साधेपणे साजरा करावा यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गणपतीची मूर्ती काही फुटांची असाावं इथपासून ते किती जणांनी आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी व्हावे इथपर्यंत नियम आखून दिलेले आहेत. त्याचे पालन करावे असे आयुक्तांनी आवाहन केले आहे.

तसेच विसर्जनावेळी होणारी गर्दी लक्षात घेवून महापालिका क्षेत्रात यावर्षीही 13 ठिकाणी कृत्रीम तलावांची निर्मिती आणि एकूण 20 ठिकाणी मुर्ती स्वीकृती केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहेत. या ठिकाणी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याला प्राधान्य देऊन आणि भाविकांच्या सोयीसाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आता डिजीठाणे कोव्हिड-19 डॅशबोर्ड च्या संकेतस्थळावर विसर्जनाचे टाइमस्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शुक्रवार 14 ऑगस्ट,2020 पासून ठाणेकरांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी www.covidthane.org या महानगरपालिकेच्या अधिकृत डिजीठाणे डॅशबोर्ड लिंकवर जाऊन Ganesh Visarjan Booking हे पर्याय निवडावे लागेल. नंतर आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक करून महानगरपालिकेला योग्य नियोजन करण्यास सहकार्य करावे असे आवाहान महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

या पद्धतीने एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रसार होण्यापासून देखील रोख लावता येणार आहे.