मुंबई : अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून (10 मे) सुरु होणार आहे. दहावीचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांना या अर्जाचा एक भाग भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी हा अर्ज भरण्यासाठी शाळांनी नियोजन करावे, अशा सूचना शिक्षण उपसंचालकांनी सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांना दिल्या आहेत.


विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेतल्या युजर आयडी आणि पासवर्डच्या आधारे हा अर्ज भरता येईल. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना त्यांचा दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकायचा आहे. यानंतर मंडळाकडे असलेली विद्यार्थ्यांची सर्व माहिती उपलब्ध होईल. यानंतर विद्यार्थी यामध्ये बदल करु शकतात.

दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या अर्जाचा दुसरा भाग भरता येईल.

http://mumbai.11thadmission.net या वेबसाईटवरुन अर्ज भरता येणार आहेत. अकरावीचे ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची सर्व जबाबदारी शिक्षण महामंडळानं शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपवली आहे. विद्यार्थी आणि पालकांना शाळेत बोलावून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावयाचे आहेत.