मुंबई : उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज सकाळपासूनच मुंबईतील सीएनजी ( कंप्रेस्ड नॅचरल गॅस) पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे महानगर गॅस कंपनीला कमी प्रमाणात गॅस पुरवठा होत आहे. त्यामुळे वडाळा येथील सिटी गेट स्टेशनवर सीएनजी सेवेवर त्याचा परिणाम जाणवतोय.
घरगुती पीएनजी ( पाईप्ड नॅचगल गॅस ) ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय प्राधान्य देत गॅस पुरवण्यात येईल, असे महानगर गॅस कडून सांगण्यात आले आहे. मात्र उरण प्लांटमधील बिघाडामुळे कमी प्रमाणात गॅस उपलब्ध होत आहे. परिणामी मुंबईतील एकूण 6 सीएनजी पुरवठा स्टेशनवर सीएनजी पुरवठा खंडित झाल्यामुळे ते बंद राहू शकतात.
आज सकाळी सीएनजी गॅस पंपांवर सीएनजी भरण्यासाठी लागणारे 90 बार प्रेशर सीएनजीची कमी उपलब्धता असल्याने हाय डेन्सिटी गॅस मिक्स करुन वाहनांमध्ये गॅस भरला जात आहे. या परिस्थितीचा सीएनजीवर चालविल्या जाणाऱ्या बस आणि टॅक्सी मिळून शहरातील जवळपास 6 लाख वाहनांवर याचा परिणाम होऊ शकतो.
ओएनजीसीकडून नैसर्गिक वायूचा पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होताच गॅसचा पुरवठा सामान्य करण्यात येईल, अशी माहिती महानगर गॅसकडून देण्यात आली आहे.
उरणमध्ये ओएनजीसी प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड, सीएनजी टॅक्सी, बस आणि कार चालकांना फटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2019 09:26 AM (IST)
उरणमध्ये ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे सीएनजी बस, टॅक्सी आणि कार चालकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -