ठाणे : ठाण्यातील आणखी एक तरुण आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे. 28 वर्षीय तबरेज नूर मोहम्मद तांबे हा मूळचा मुंब्र्याचा आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे.


तबरेज 2015 च्या सुरुवातीला कामाच्या निमित्ताने इजिप्तला गेला होता. तिथून तो लीबियाला पोहोचला. त्यानंतर तबरेज आयसिसमध्ये सामील झाला. आयसिसमध्ये सामील झाल्याची माहिती खुद्द तबरेजने कुटुंबीयांना दिली.

"लीबियाला जाण्यासाठी तबरेज सौदी अरेबियातील अली नावाच्या एका मित्रासोबत आधी इजिप्तला गेला. आता ते दोघेही आयसिसमध्ये सामील झाले आहेत," असं तबरेजचा भाऊ सौद नूर मोहम्मद तांबेने सांगितलं. पोलिसांच्या माहितीनुसार, "आयएसआयएमध्ये सामील होण्यासाठी अलीने तबरेजचं ब्रेनवॉश केलं. रियाधमध्ये काम करत असताना तबरेज अलीच्या संपर्कात आला होता."

2015 मध्ये तबरेज सौदी अरेबियातील रियाधमधून काम करुन परतला. त्यानंतर तो इजिप्तला जाण्यासाठी घरातून निघाला. कामाच्या निमित्ताने तबरेज निघाला असावा, असं कुटुंबीयांना वाटलं. पण काही महिन्यांपूर्वी स्वत: तबरेजने कुटुंबीयांना कॉल करुन, आपण लीबियात पोहोचलो असून आयसिसमध्ये सामील झाल्याची माहिती दिली.

याप्रकरणी बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम 16,18 18 (ब), 20, 38 आणि 39 गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरु आहे.