मुंबई : मुंबईत दर दहा विद्यार्थ्यांपैकी एकाला चष्मा असल्याचं समोर आलं आहे. पाच ते बारा वर्षे वयोगटातील तब्बल 91 हजार मुलांना मायोपिया झाला आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे लहानग्यांच्या डोळ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.


सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत मुंबईतील जे जे रुग्णालय आणि राज्य आरोग्य विभागानं साडेसात लाख लहान मुलांवर केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे.

मोबाईलचा सातत्याने वापर केल्यामुळे 71 हजार मुलांना कोवळ्या वयातच चष्मा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही चिमुरड्यांना तर पहिल्या वाढदिवशीच चष्म्याचा भार सहन करावा लागला. मोबाईल हे सध्याच्या पिढीसाठी खेळणं झाल्याने हा त्रास उद्भवत आहे.

वयाच्या सहाव्या वर्षी मुलांची दृष्टी विकसित होते. मात्र याच वयात मोबाईलचा अतिवापर केल्यास डोळ्यांना कायमस्वरुपी हानी होऊ शकते.

सर्वसाधारणपणे आपण मिनिटाला पंधरा वेळा पापण्यांची उघडझाप करतो. मात्र मोबाईल वापरताना हा आकडा निम्म्यावर येतो. त्यामुळे डोळ्यांना शुष्कपणा येतो. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ मोबाईलचा सातत्याने वापर केल्यास डोळ्यांची कधीही न भरुन निघणारी हानी होते.