मुंबई : भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील जय माता दी कंपाऊंडमधील रंगकामाचे ब्रश बनविणाऱ्या कारखान्याला आणि गोदामाला आज पहाटे आग लागली होती. तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीत आतापर्यंत पाच गोदामं जळून खाक झाली आहेत. तसेच आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.


गोदामानजीक एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सुरुवातीला आग लागली होती. ती आग वाढू लागल्यानंतर शेजारच्या जे क्रमांकाच्या इमारतीमधील कबावत ब्रश कंपनीच्या कारखान्यालादेखील आग लागली. कारखान्यात मोठ्या प्रमाणात रंग आणि थिनर या केमिकलचा साठा असल्याने त्याने पेट घेतला. केमिकल्समुळे आग अधिकच भडकली. या आगीमुळे पहिल्या मजल्यावरील पाच गोदामं जळून खाक झाली आहेत.

या आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु आग अधिकच भडकू लागल्याने ठाणे अग्निशमन दलानेदेखील एक गाडी घटनास्थळी रवाना केली. तब्बल 8 तास अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.