नवी दिल्ली : भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकच्या वेळी बालाकोटमध्ये जवळपास 300 मोबाईल फोन अॅक्टिव्ह होते अशी माहिती समोर आली आहे. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (एनटीआरओ) आणि रॉच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर एएनआयनं हे वृत्त दिलं आहे. त्यामुळे बालाकोटमध्ये जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याच्या दावा खरा ठरत आहे.
भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 मिराज 2000 विमानांच्या मदतीने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. जवळपास 1000 किलोचे बॉम्ब दहशथवाद्यांच्या तळांवर फेकण्यात आले. या हल्ल्यामध्ये जवळपास 300 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जात आहे. याची शहानिशा सर्वच पातळीवर सुरु आहे.
देशाच्या इतर गुप्तचर यंत्रणादेखील एनटीआरओच्या संपर्कात होत्या. त्यांनादेखील बालाकोटच्या तळांवर 300 मोबाईल अॅक्टिव्ह असल्याचं आढळून आलं होतं. मात्र हवाई दलाच्या कारवाईतील मृत दहशतवाद्यांचा आकडा अद्याप सरकारकडूनही जाहीर करण्यात आलेला नाही.
40 जवान शहीद आणि एअर स्ट्राईक
14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारतीय वायूदलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करुन जैश-ए-मोहम्मदचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते.