दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी ओला-उबर चालकांनी संप स्थगित केला आहे, अशी माहिती काँग्रेस नेते सचिन अहिर यांनी दिली. 15 नोव्हेंबरपर्यंत इन्सेन्टिव्ह योजना लागू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार प्रत्येक ट्रीपमागे चालकांना अधिक पैसे मिळणार आहेत. 15 तारखेनंतर चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे.
बेस फेअर वाढवण्याच्या मागणीसाठी ओला-उबर चालकांनी मुंबईतील चकाला भागात असलेल्या कार्यालयात आंदोलन केलं होतं. ऑनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे 100 ते 150 रुपयांच्या दरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे 18 ते 23 रुपये भाडे करावे, कंपनीने नवीन वाहनं बंद करुन सध्या असलेल्या वाहनांना समान काम द्यावं, या मागण्यांसाठी 22 ऑक्टोबरपासून ओला, उबर चालकांनी संप पुकारला होता.
ओला, उबर व्यवस्थापनाशी गुरुवारी संघटनांची बैठक होणार होती. परंतु कंपन्यांचे प्रतिनिधी फिरकले नसल्याने चर्चा होऊ शकली नाही. तोडगा निघाला नाही, तर मातोश्रीवर मोर्चा काढण्याचा इशारा ओला, उबरच्या चालकांनी दिला होता.