मागच्या सीटवरुन पुढे बसली, ओला चालकाने छेड काढली
एबीपी माझा वेब टीम | 23 May 2018 11:40 AM (IST)
24 वर्षीय तरुणीची छेडछाड आणि असभ्य वर्तनप्रकरणी पवई पोलिसांनी ओला चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई: प्रवासी तरुणीच्या छेडछाडप्रकरणी ओला कॅब चालकाला अटक करण्यात आली आहे. 24 वर्षीय तरुणीची छेडछाड आणि असभ्य वर्तनप्रकरणी पवई पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सुरेश कुमार यादव असं या ओला चालकाचं नाव आहे. संबंधित तरुणी सोमवारी संध्याकाळी नरिमन पॉईंटवरुन पवईकडे निघाली होती. त्यासाठी तिने ओला कॅब बूक केली. पण प्रवासादरम्यान मागे बसलेल्या तरुणीला अस्वस्थ वाटू लागल्याने ती पुढच्या सीटवर येऊन बसली. यावेळी ओला चालकाने चुकीचा अर्थ काढत, रंगेलपणा सुरु केला. सुरेश कुमारने तिच्याशी अश्लील संभाषण सुरु करत, तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने बिथरलेल्या तरुणीने मध्येच गाडी थांबवायला सांगितलं. त्यानंतर तिने थेट पवई पोलीस ठाणे याबाबतची तक्रार दिली. पवई पोलिसांनी सुरेश कुमार यादव या ओला कॅब चालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे.