मुंबई : पत्नीचा मोबाईल नंबर मागत असल्याच्या कारणावरुन पतीसह पत्नीने युवकाला जबर मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील चेंबुरमध्ये घडली.


या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपी दाम्पत्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

चेंबुरमधील व्ही के कृष्णन मेनन चाळीत आरोपी पती यशवंत रामू झाडे आणि पत्नी मीना यशवंत झाडे राहतात. याच चाळीत राहणारा राकेश शिंदे हा मीना झाडेकडे वारंवार मोबाईल नंबर मागत असे.

याबद्दल मीनाने आपल्या पतीला सांगितलं. चिडलेल्या यशवंतने सोमवारी सकाळी राकेशच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली. त्यानंतर रात्री राकेश याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेला असता, झाडे दाम्पत्याने त्याला बेदम मारहाण केली.

राकेश बेशुद्ध पडल्यामुळे नातेवाईकांनी त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

टिळक नगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपी पती पत्नीला अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 25 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी यशवंत हा चेंबुरमध्ये एका गारमेंट कंपनीत काम करत होता तर मृत राकेश शिंदे हा कपड्याचे टेडी बिअर करुन विकण्याचा व्यवसाय करत होता, अशी माहिती परिमंडळ सहाचे पोलिस आयुक्त शहाजी उमाप यांनी दिली.