विरार : एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्याचा सौदा करणं एका व्यापाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. जुन्या नोटा बदलून देण्याच्या आमिषाने एका ठकसेनानं व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा घातला आहे.


विकास झा नावाचा आरोपी संजय जैन या व्यापाऱ्याची फसवणूक करुन पसार झाला आहे. विकास झा हा पाच लाखांची रोकड नेत असताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सुरुवातीला व्यापाराचा विश्वास संपादन व्हावा, यासाठी आरोपीनं जैन यांना 10 ते 15 हजारांच्या जुन्या नोटा बदलून दिल्या. त्यानंतर थेट पाच लाख बदलून देतो, असं आरोपीनं सांगितलं. मात्र तो पैसे घेऊन परतलाच नसल्याने व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी आरोपी विकास झाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपीवर विरार पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे पाचहून जास्त गुन्हे दाखल आहेत.