OBC Reservation : राज्यात रखडलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपकडून ओबीसींच्या राजकीय आरक्षणात अडथळे आणले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राहुल वाघ आणि विकास गवळी यासारखे लोक OBC आरक्षणाला बाधा येईल अशी कृती करत आहेत. त्यांनी कोर्टात याचिका दाखल करून संपूर्ण प्रक्रिया लांबवली आहे. हे लोकं भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे एकीकडे विरोधी पक्ष म्हणून OBC आरक्षणासाठी पाठींबा द्यायचा आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात याचिका करायची, असा भाजपचा दुहेरी डाव सुरू असल्याचा आरोप राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. भाजप नेत्यांच्या अशा पावित्र्यामुळे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचेही नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य मागास आयोगाची भेट घेतली. राज्य मागास आयोगाची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केले नाही. सुप्रीम कोर्टाला आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी इम्पेरिकल डेटा हवा आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यापैकी आता एक महिना झाला असून अधिकारी त्यावर काम करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. इम्पेरिकल डेटा लवकरच उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मध्य प्रदेशात हा डेटा महसूल विभागाने जमा केला आहे. इतर राज्यांनी कोणती पावले उचलली आहेत याची माहिती घेऊन कोर्टात टिकेल असा डेटा तयार करण्याची विनंती केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांना विनंती करणार
ओबीसी आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सरकारची मदत केली आहे. आता कोर्टात जाऊन ओबीसी आरक्षणाला कोर्टात जाऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आवरण्याची विनंती करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
त्या जागेवर ओबीसी उमेदवार
राज्यातील ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्यास त्या जागेवर आम्ही ओबीसी उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही भुजबळांनी स्पष्ट केले.