मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले होते. आता ओबीसी राजकीय आरक्षणासाठी देखील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मोठ्या संख्येने मोर्चा काढण्याच्या तयारीत ओबीसी नेते आहेत. या मोर्चाची सुरुवात 29 जुलैला बारामतीमधून होणार आहे. या पहिल्या मोर्चाला सरकारने गांभीर्याने घेतलं तर ठीक नाहीतर असेच दहा मोठे मोर्चे राज्यभर काढणार असल्याचं ओबीसी नेत्यांनी म्हटलं आहे.
बारामतीमधून देशात आणि राज्यात आवाज लवकर पोहचत असल्याने आम्ही या आंदोलनाची सुरुवात बारामती या ठिकाणाहून करत आहे. महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार आहेत. आणि सर्वकाही राज्याची सूत्रे बारामती मधून हालत असल्याचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवार यांच्याकडे आहेत. ज्याप्रमाणे मराठा समाजाला सारथीमधून निधी येतात त्याचप्रमाणे ओबीसी समाजालाही निधी दिला पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवारांकडे आहे. म्हणून या मोर्चाची सुरुवात बारामतीमधून करत असल्याचे आयोजकांनी म्हटलं आहे.
29 जुलैला बारामतीमध्ये या मोर्चाला सुरुवात होईल. त्यासाठी सर्वपक्षीय ओबीसी नेते उपस्थित असणार आहेत. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे, भाजप कडून पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे तर शिवसेनेकडून संजय राऊत यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे बारामती येथे होणाऱ्या ओबीसींच्या विराट मोर्चाला किती नेते उपस्थित राहणार हे बघावं लागणार आहे.
न्यायालय ओबीसी राजकीय आरक्षण देण्यास तयार आहे. मात्र राज्य सरकार थेट भूमिका घेत नाही. तसेच केंद्र सरकारनेही आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात हा विराट मोर्चा असणार आहे. बारामतीमधील होणाऱ्या या मोर्चात सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही. तर महाराष्ट्राच्या मुख्य शहरात अशाच पद्धतीचे दहा विराट मोर्चे काढले जाणार असल्याच ओबीसी नेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात आधीच कोविडच्या तिसऱ्या लाटेची भीती असताना हा मोर्चा काढण्यासाठी राज्य सरकार परवानगी देणार का? या मोर्चात मंत्री सहभागी होणार का? असा ही प्रश्न समोर येत आहे.
मराठा आरक्षणाच्यानंतर आता ओबीसी राजकीय आरक्षणच्या मुद्द्यावर ओबीसी नेते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. याच आरक्षणा संदर्भात पुढील वाटचाल ठरवण्यासाठी लोणावळा या ठिकाणी ओबीसी परिषद पार पडली होती. त्यानंतर आता ओबीसी समाज आंदोलनाच्या तयारीत आहे.