मुंबई : मध्य रेल्वेवर चार मेधा लोकल धावणार असल्याने आनंदत असलेल्या प्रवाशांचा हिरमोड होणार आहे. कारण या मेधा लोकल आता मध्य रेल्वेऐवजी पश्चिम रेल्वेच्या मार्गावर धावणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


 मध्य रेल्वेवर एकूण चार मेधा लोकल धावणार होत्या. त्यापैकी एक कल्याण यार्डमध्ये दाखलही झाली होती. मात्र, पश्चिम रेल्वेमार्गावर आधीपासूनच मेधा लोकल धावत असल्याचे कारणं देत, या सर्व मेधा लोकल आता पश्चिम रेल्वेवर चालवल्या जाणार आहे, असे रेल्वे प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

मेधा लोकल चालवण्यासाठी आणि मेंटेनन्ससाठी हे तंत्रज्ञान माहित असलेले कर्मचारी मध्य रेल्वेकडे नाहीत, असेही कारण दिले जात आहे.

दरम्यान, आता या 4 नवीन मेधा लोकलऐवजी 4 जुन्या बम्बार्डीयर लोकल मध्य रेल्वेला देण्यात येणार आहेत. म्हणजेच पुन्हा एकदा मध्य रेल्वेला पश्चिम रेल्वेच्या जुन्या लोकल मिळणार आहेत.