कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौऱ्याचा मुंबईतील उत्तर भारतीय लोक निषेध करणार आहेत. उत्तर भारतीय महा पंचायत मोदींना काळे झेंडे दाखवणार आहे. मोदी उत्तर प्रदेशमधील खासदार असूनही तेथील विकास झाला नसल्याचं उत्तर भारतीय महापंचयतकडून सांगण्यात येत आहे.


मोदी हे वाराणसीचे खासदार आहेत. त्यामुळे मोदींकडून उत्तर प्रदेशच्या विकासाची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे याचा आम्ही निषेध करणार असल्याचं उत्तर भारतीय महापंचयीचे अध्यक्ष विनय दुबे यांनी आपली भूमिका मांडली.


काही दिवसांपूर्वी याच उत्तर भारतीय महापंचायतीच्या मंचावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भरतीयांशी संवाद साधत यूपी-बिहारच्या नेत्यांवर टीका केली होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 18 डिसेंबर रोजी कल्याणमध्ये येणार आहेत. यावेळी मेट्रोच्या पाचव्या आणि नवव्या टप्प्याचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते होईल. मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी नरेंद्र मोदी कल्याणमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी मेट्रो सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं.