नवी मुंबई : आपल्या युरोपियन मैत्रिणीसोबत लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एक 22 वर्षीय मणिपुरी विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकात याबाबत तक्रार देण्यात आली आहे. सदर विद्यार्थिनी ही 11 सप्टेंबर रोजी आपल्या युरोपियन मैत्रिणीसोबत वाशी ते गोवंडी जनरल डब्यातून प्रवास करत होती. त्याच दरम्यान चालत्या ट्रेनमध्ये दोन जणांनी या मणिपुरी विद्यार्थिनीची छेड काढली असल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीने वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात केली. यासोबतच पीडित विद्यार्थिनीने जेव्हा या दोन नराधमांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कोणत्याही प्रवाशांनी त्यांना मदत केली नसल्याची खंत पीडितेने व्यक्त केली. शनिवारी पीडित विद्यार्थिनीने सोशल साईट्सवरही आपल्यासोबत झालेल्या या घटनेसंबंधीची माहिती शेअर केली होती. वाशी रेल्वे पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून दोन अज्ञात आरोपींविरोधात 354 आणि 354A नुसार गुन्हा नोंद केला आहे.