मुंबई: येत्या दोन दिवसांत नोटबंदीनंतर होणारा पहिला पगार बँकेत येणार आहे. मात्र, तो हाती कसा पडणार याची चिंता सगळ्यांनाच लागली आहे. आधीच बँकांबाहेर लागणाऱ्या रांगांनी कातावलेल्या मुंबईकरांना पुन्हा बँकेबाहेर उभं राहावं लागणार आहे.

मुंबई पोलिसांनी मात्र आपल्या कर्मचाऱ्यांची रांगा लावण्याच्या कटकटीतून सुटका केली आहे. मुंबई पोलिस आणि अॅक्सिस बँकेच्या वतीनं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा देण्यात येणार आहे. आजपासून पुढचे आठ दिवस दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत अॅक्सिस बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन पोलिसांना चेकद्वारे आपला पगार काढता येणार आहे. त्याशिवाय मुंबई पोलीस मुख्यालय, नायगाव मुख्यालय आणि इतर 5 विभागांजवळ मायक्रो एटीएमची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांच्या 93 पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यासोबतच, क्राईम ब्रँच, आणि इतर कर्मचारी मिळून 45 हजार पोलिसांना याचा फायदा मिळणार आहे.