औरंगाबाद: मराठा मोर्चाकडून येत्या 10 तारखेला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आलेली नाही, असं स्पष्टीकरण मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिलं.


10 जानेवारीला महाराष्ट्र बंदची  घोषणा करण्यात आल्याबाबतचे मेसेज सध्या व्हॉट्सअपवर फिरत आहेत. पण अशा कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलं आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर दलित संघटनांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.  त्यानंतर मराठा समाजाकडूनही बंदची हाक दिल्याचे मेसेज फिरत होते. मात्र ती अफवा असून, मराठा मोर्चाने कोणताही बंद पुकारलेला नाही, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

मराठा क्रांती मोर्चा शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करते, त्यामुळे बंद करून कोणालाही वेठीस धरणार नाही, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.