'केशवसृष्टी'जवळचे आदिवासी पाडे अंधारात
एबीपी माझा वेब टीम | 02 May 2018 02:57 PM (IST)
बोरिवली येथील गोराई गावाजवळ आदिवासी पाड्यात आजही वीज नाही. विशेष म्हणजे हे आदिवासी पाडे भाजपच्या केशवसृष्टीपासून फक्त 15 किमी अंतरावर आहेत.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व गावात वीज पोहोचल्याचा दावा केला. मात्र देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील आदिवासी पाडे आजही अंधारातच आहेत. बोरिवली येथील गोराई गावाजवळ आदिवासी पाड्यात आजही वीज नाही. विशेष म्हणजे हे आदिवासी पाडे भाजपच्या केशवसृष्टीपासून फक्त 15 किमी अंतरावर आहेत. वीज काय कुठे आहे माहीत नाही,कधी बघितली नाही, असं गोराई गावातील जमझाडा या आदिवासी पाड्यातील एका तरुणीने सांगितलं. गोराई गावात पाच आदिवासी पाडे आहेत, तिथे आजही विजेची समस्या आहे. जमझाडा पाड्यात तर आजही वीज नाही. वर्षानुवर्षे लोक अंधारात आयुष्य काढत आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीतील आदिवासी पाड्यात अजून वीज पोहोचली नाही. हे आदिवासी पाडे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि भाजप कॅबिनेट मंत्री विनोद तावडे यांच्या मतदारसंघात येतात. गेल्या चार वर्षात मंत्री एकदाही इथे आले नसल्याचे स्थानिक नगरसेवक सांगतात. विशेष म्हणजे केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल हे ही मुंबईचे आहेत. संबंधित बातम्या