मुंबई : भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित शाह नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राणेंसंदर्भात आज कोणताही निर्णय होणार नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या घरातील गणपतीचं दर्शन घेऊन अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याला सुरूवात झाली. त्यानंतर अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. तसंच अमित शाहांच्या हस्ते 'हमारे नरेंद्र भाई' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

त्यानंतर अमित शाहंनी मुंबईतल्या सिद्धीविनायकाचंही दर्शन घेतलं. मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाच्या दृष्टीने अमित शाहंचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

बहिण सिद्धीविनायक मंदिरातच, अमित शाह पुढे रवाना

मुंबईच्या दौऱ्यावर असलेले भाजप अध्यक्ष अमित शाहांनी सिद्धीविनायक मंदिरात गणपतीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर अमित शाह पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. मात्र त्यांची बहीण मंदिर परिसरातच राहिली.

अमित शाह कुठेच दिसत नसल्यामुळे त्यांची बहीण थोडीशी कावरी-बावरी झाल्याचं दिसलं. अखेर भाजप खासदार पूनम महाजन यांनी अमित शाह यांच्या बहिणींनी मंदिरातून बाहेर पडण्यासाठी मदत केली.